पुढील वर्षापासून NEET परीक्षा ऑनलाईन पद्धतीने; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, पेपरफुटी रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय..


मुंबई : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या संताप आणि गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून NEET UG परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

यंदाच्या नीट परीक्षेतील पेपरफुटी, गैरव्यवहार आणि परीक्षा व्यवस्थेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांनंतर केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना संगणकावर परीक्षा द्यावी लागणार असून त्यामुळे प्रश्नपत्रिका लीक होण्याच्या घटना रोखता येतील, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता सीबीआयमार्फत केली जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही. शिक्षण व्यवस्थेशी खेळ करणाऱ्यांवर झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षा देण्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी केंद्र सरकार विशेष काळजी घेत आहे. यासोबतच एनटीएमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य करत लवकरच परीक्षा व्यवस्थेत अनेक बदल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नीट परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेली एनटीए संस्था देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करते. यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य दिले जाणार आहे.

परीक्षेच्या प्रक्रियेतही काही बदल करण्यात आले आहेत. ओएमआर शीटवर सही आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळावा म्हणून परीक्षेचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार असून हवामानाची परिस्थिती
लक्षात घेऊनही पुढील निर्णय घेतले जातील, असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण माफियांनाही थेट इशारा दिला. २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेपासून शिक्षण माफियांनी दूर राहावे. परीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा कठोर इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, ३ मे २०२६ रोजी झालेली NEET UG परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली होती. या परीक्षेला देशभरातील लाखो विद्यार्थी बसले होते. परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. आता २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!