आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना मोठा झटका! फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे? मोठा बदल समोर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने शासकीय नोकरभरतीबाबत मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षा शुल्कात सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही. अशा उमेदवारांची निवड फक्त त्यांच्या राखीव कोट्यातील जागांसाठीच केली जाईल.

पूर्वीच्या नियमानुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवार गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर असल्यास त्यांना खुल्या प्रवर्गातील जागांवर नियुक्ती मिळत होती. मात्र आता जर उमेदवाराने कोणतीही सवलत घेतली असेल, तर तो खुल्या प्रवर्गातील स्पर्धेसाठी अपात्र मानला जाईल, अगदी त्याचे गुण कट-ऑफपेक्षा जास्त असले तरीही.
हा निर्णय MPSC, शिक्षक भरती, पोलीस भरती तसेच सर्व सरळसेवा भरती प्रक्रियांना लागू राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी स्पर्धा तुलनेने कमी होण्याची शक्यता असून, राखीव प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. एकीकडे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी, दुसरीकडे राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
