मद्यप्रेमींसाठी खुशखबर! 100 हून अधिक दारू ब्रँड्स स्वस्त, पाहा संपूर्ण यादी…

नवी दिल्ली : आखाती देशांतील तणावामुळे जागतिक बाजारात महागाई वाढताना इंधन, एलपीजी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत केरळमधील मद्यप्रेमींना मात्र दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे.

केरळ राज्यात दारूच्या दरांमध्ये कपात करण्यात आली असून अनेक प्रसिद्ध ब्रँड्सवर १० ते ५० रुपयांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील बीव्हरेजेस कॉर्पोरेशन (BEVCO) ने पुरवठादार कंपन्यांकडून दर कमी झाल्यानंतर हे नवे दर लागू केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही ब्रँड्सची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने गोदामांमध्ये साठलेला जुना स्टॉक कमी करण्यासाठी तसेच मागणी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शंभरहून अधिक प्रकारच्या मद्यांचा समावेश आहे.

‘ओल्ड मॉन्क’, ‘ऑफिसर्स चॉईस’ आणि ‘ओल्ड पोर्ट’ यांसारख्या लोकप्रिय रम ब्रँड्सच्या ५०० मिली बाटलीवर सुमारे १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर इतर प्रीमियम ब्रँड्सवर २० ते ५० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

याशिवाय ‘सदर्न चॉईस’, ‘निकोलस’ आणि ‘एसपीआय’ या ब्रँड्सच्या विविध ब्रांडी, व्होडका आणि व्हिस्की प्रकारांच्या किमतीही सुधारित करण्यात आल्या आहेत. काही उत्पादने आता ₹३०० पासून उपलब्ध होत आहेत.
हे नवीन दर १२ मे पासून संपूर्ण केरळमध्ये लागू करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी ग्राहकांना बीव्हकोच्या अधिकृत संकेतस्थळावर यादी पाहता येणार आहे.