प्रेमाच्या नावाखाली रक्तरंजित सूड! प्रेयसीसमोरच तरुणाची निर्घृण हत्या; डोळे फोडून गुप्तांग कापल्याने बिहार हादरलं


बिहार : विवाहित महिलेसोबतचे प्रेमसंबंध एका तरुणाच्या जीवावर इतके भयंकर बेततील, याची कुणालाही कल्पना नव्हती. रात्री प्रेयसीच्या एका फोननंतर भेटायला गेलेल्या २५ वर्षीय तरुणाला आधी सापळ्यात अडकवण्यात आलं आणि नंतर त्याची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली की संपूर्ण बिहार हादरलं आहे. आरोपींनी तरुणाचे डोळे फोडले, गुप्तांग कापले आणि मृतदेहाला आत्महत्येचं रूप देण्याचाही प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही संपूर्ण थरारक घटना त्याच्या प्रेयसीसमोरच घडली.

पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे घडलेल्या या क्रूर हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव अजय पटेल असे असून तो हरसिध्दी भागातील मठलोहियर गावचा रहिवासी होता. अजयचे गावातीलच तब्बू नावाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती तब्बूचा पती असलम मियां याला मिळाल्यानंतर त्याने अजयला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि तब्बू यांचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर असलम संतप्त झाला होता. जीवाला धोका असल्याची भीती वाटल्याने अजय दोन महिन्यांपूर्वी पंजाबमधील लुधियाना येथे कामासाठी गेला होता. मात्र ६ तारखेला तो पुन्हा गावात परतल्याची माहिती मिळताच असलमने पत्नीला सोबत घेऊन हत्येचा प्लॅन आखला.

८ तारखेच्या रात्री अजय एका कार्यक्रमावरून परतत असताना तब्बूने त्याला फोन करून भेटायला बोलावले. अजय घटनास्थळी पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या असलम आणि त्याच्या साथीदारांनी त्याला पकडले. आरोपींनी अजयला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सुरीसारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

हत्या केल्यानंतर हा प्रकार आत्महत्या वाटावा यासाठी आरोपींनी अजयचा मृतदेह त्याच्या घराजवळील जनावरे बांधण्याच्या ठिकाणी दोरीने लटकवून ठेवला. सकाळी मृतदेह आढळल्यानंतर गावात खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत डॉग स्क्वॉड आणि एफएसएल टीमची मदत घेतली. खोजी कुत्रा थेट आरोपीच्या घरापर्यंत पोहोचल्याने पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि अवघ्या १२ तासांत हत्येचा उलगडा झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तब्बूला अटक केली असून तिने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी असलम आणि त्याचे साथीदार सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या निर्घृण हत्येमुळे बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!