PM मोदींच्या आवाहनाचा महाराष्ट्रात मोठा परिणाम! १२ आमदारांचा जपान दौरा रद्द; सरकार ॲक्शन मोडमध्ये


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. इंधन बचतीसाठी आणि वाढत्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १२ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानमधील दोन राज्यांच्या गव्हर्नरांनी महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला अधिकृत भेटीसाठी निमंत्रण दिले होते. या दौऱ्यासाठी १२ आमदार जाणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः पुढाकार घेत हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम भारतावरही होत असून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी अलीकडील दोन सभांमध्ये देशवासियांना इंधन बचत करण्याचे आणि अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले होते.

PM मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पेट्रोल-डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. परदेशात लग्न, सुट्ट्या आणि पर्यटनासाठी जाण्याची वाढती संस्कृती सध्या थांबवण्याची गरज आहे.” त्यांनी नागरिकांना किमान एक वर्षासाठी परदेश प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले. तसेच सोन्याची खरेदी टाळा, वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मिटिंग्सना पुन्हा प्राधान्य द्या, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या या आवाहनाला महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. आमदारांचा जपान दौरा रद्द झाल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी काही खर्चकपातीचे आणि इंधन बचतीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारचे निर्णय घेतले जाणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!