मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय! महाराष्ट्र पोलिसांच्या हक्काच्या घरांसाठी सरकारची मोठी आर्थिक मदत; इतके कोटी रुपये मंजूर

मुंबई : राज्यातील पोलिसांना स्वतःचे घर मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत तब्बल ५४५९ पोलिसांना घरबांधणीसाठी १७६८.०८ कोटी रुपयांच्या अग्रीम निधीला मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना सरकार पोलिसांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील अनेक पोलीस कर्मचारी कठीण परिस्थितीत सेवा बजावत असतात. अनेकांना स्वतःचे घर नसल्याने भाड्याच्या घरात किंवा शासकीय निवासस्थानी राहावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पोलिसांना घर खरेदी किंवा घरबांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाणार असून, मंजूर करण्यात आलेला १७६८.०८ कोटी रुपयांचा निधी पोलिसांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलीस कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
