खळबळजनक घटना! आईचं दुसऱ्यावरच जडलं प्रेम, मुलाचा संताप अनावर; पुण्यात मध्यरात्री हत्येची धक्कादायक घटना उघड

पुणे : अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधांचा शेवट अनेकदा गंभीर वळण घेतो. असाच प्रकार पुण्यात पुन्हा एकदा समोर आला आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नगर परिसरात रविवारी रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

एका विवाहित महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून तिच्याच मुलाने तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलाने आपल्या साथीदारासह आईच्या प्रियकराचा काटा काढल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
दीपक क्षीरसागर (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दीपक यांचे संबंधित विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना महिलेच्या मुलाचा आणि कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर हल्ला करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांची सखोल चौकशी सुरू असून हत्येसाठी कोणती शस्त्रे वापरली आणि इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे इंद्रायणी नगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.