इंधन वाचवा, वर्षभर सोने खरेदी करू नका, मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया..


नवी दिल्ली : जगभरात वाढत असलेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी नागरिकांना इंधन, गॅस आणि इतर संसाधनांचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विनाकारण पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक असेल तेव्हाच वाहनांचा वापर करा, शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतूक वापरा आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, असेही त्यांनी म्हटले.

तसेच खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचे आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचे आवाहनही मोदी यांनी केले. डिझेल पंपाऐवजी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर वाढवावा, असे सांगत त्यांनी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जगभरात तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण होत असून अनेक देश गंभीर संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमध्ये इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत.

फडणवीस म्हणाले, आपल्या शेजारील काही देशांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनीही जबाबदारीने इंधनाचा वापर करणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, जगभरातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. अशा वेळी ऊर्जा बचत करणे आणि पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!