“कालपर्यंत गगनाला भिडलेले दर आज थेट जमिनीवर!” सोने ४० हजारांनी स्वस्त, चांदीत २ लाखांची मोठी घसरण

सराफा बाजारात सध्या अक्षरशः उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी विक्रमी दर गाठणारे सोने आणि चांदी आता मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले असून, ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत बदल दिसू लागले असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर झाला आहे.

गेल्या पाच महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल ३० ते ४० हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एकेकाळी विक्रमी उच्चांकावर पोहोचलेले सोने आता प्रति तोळा १ लाख ५० हजार ते १ लाख ५२ हजार रुपयांच्या दरम्यान स्थिरावले आहे. शुक्रवारी सराफा बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा दर १ लाख ५२ हजार रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, गेल्या काही काळात चांदी तब्बल २ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदीचे दर प्रति किलो २ लाख ५० हजार ते २ लाख ६१ हजार रुपयांच्या आसपास आहेत. आठवड्याच्या शेवटी चांदीचा दर २ लाख ६१ हजार रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला.

विशेष म्हणजे, अमेरिका-इराण युद्धविरामानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना सोने आणि चांदी मात्र स्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, गुंतवणूकदारांचा बदललेला कल आणि सुरक्षित गुंतवणुकीतील घट यामुळे या दरांमध्ये घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही मोठी घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. अनेकांनी खरेदीसाठी सराफा बाजाराकडे धाव घेतली असून, आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती पुन्हा बदलल्यास दरात चढ-उतार होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.