“चित्रपटातून थेट सत्तेच्या शिखरावर!” तमिळनाडूत विजय यांचा शपथविधी; जल्लोषात मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकारणात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना अखेर आज पूर्णविराम मिळाला. अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे लोकप्रिय नेते विजय यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. चेन्नईतील भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय मंचावर येताच संपूर्ण परिसर टाळ्या, घोषणाबाजी आणि शिट्ट्यांच्या आवाजाने दणाणून गेला. “थलपती… थलपती…” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच उपस्थित जनसमुदायाने जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
विशेष म्हणजे, विजय शपथ घेत असताना त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. मुलाने राज्याच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतल्याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. हा भावनिक क्षण पाहून अनेक समर्थकही भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूच्या सत्तास्थापनेबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर सर्व राजकीय समीकरणे जुळून आल्यानंतर विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आले. शपथविधीनंतर विजय यांनी जनतेचे आभार मानत “ही सत्ता जनतेची आहे, तमिळनाडूच्या विकासासाठी आणि युवकांच्या भविष्याकरिता सरकार पूर्ण ताकदीने काम करेल,” असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर त्यांच्या समर्थकांकडून राज्यभर जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. तमिळनाडूच्या राजकारणात आता विजय यांच्या नेतृत्वाखाली कोणते नवे निर्णय घेतले जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.