छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकहितवादी; अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राऊत ; उरुळीकांचन समाधान शिबीरात १९८८ नागरीकांचा सहभाग…

उरुळीकांचन : महसूलच्या कामासंदर्भातील क्लिष्ट प्रक्रिया दूर होऊन शासन, शासकीय अधिकारी व जनता यांच्यात संवाद होऊन शासकीय कामांचा जलदगतीने निपटारा होण्याचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिमान समाधान शिबीरात असून नागरीकांनी महसूल संदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी केले आहे.

उरुळीकांचन (ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शुक्रवार (दि. ८ ) रोजी कस्तुरी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबीरात बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राऊत हे बोलत होते. कार्यक्रमात मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक उदकांत चव्हाण , हवेली भूमि उपअधिक्षक विकास गोफणे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने,तहसीलदार तृप्ती कोलते, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभागाचेसभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सदस्य सुशिला कांबळे,जिल्हापरिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती योगिनी कांचन, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे, सदस्य सुदर्शन चौधरी, कोमल कांबळे, मा.उपसभापती हेमलता बडेकर, सरपंच मिलिंद जगताप, माजी सरपंच मयूर कांचन, भाऊसाहेब तुपे, कांचन तसेच मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत म्हणाले, महसूल प्रशासन हा समाजाचा मुख्य कणाअसून सातबारा संदर्भात कामकाज ते शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी व कर्तव्य या विभागातून करण्यात येत आहे. छत्रपती महाराजस्व अभियानाचा उद्देश शासन जनतेपर्यंत पोहचून जनतेचे प्रश्न, अडचणी सोडवून जनतेचा हा विभाग मुख्य दुवा ठरावा असा उद्देश आहे. या अभियानातून हा उद्देश साध्य होत असल्याने या अभियानातून समाधान होत आहे.

या कार्यक्रमात १९८८ नागरीकांनी सहभाग नोंदवून फेरफार अंतर्गत ४०८ प्रकरणे निकालात काढण्यात आली. १५ सातबारा दुरुस्ती प्रकरणे, तुकडेबंदी प्रमाणिकरण ५ आधार कार्ड, रेशनकार्ड संदर्भात ३०६ , जिवंत सातबारा अद्यावत २७, एक खिडकी निकाली अर्ज १०२, विविध प्रमाणपत्रे वितरण ४२० , डिजिटल सातबारा वितरण ४५२, ८ अ उतारा वितरण २५२ कामे मार्गी लावण्यात आली आहे.

अभियान आयोजनात सभापती जितेंद्र बडेकर यांनी पुढाकार घेऊन उरुळीकांचन मंडळ अधिकारी माधुरी बागले, ग्राममहसूल अधिकारी प्रियंका सुंदरडे, महेश वाघमारे,सागर दरेकर, भाऊसाहेब ढगे आदींनी परिश्रम घेतले.
पदावर गेले तरी जनतेशी नाळ कायम
अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी कार्यक्रमात मांडलेला मनमोकळा संवाद सर्व उपस्थितांना भावनिक करुन गेला. कुटूंबातील सदस्य अशिक्षित असल्याने अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन कुटूंबाची लुटलेली जमीन, गरीबीतील गेलेले बालपण, आजीची अधिकारी बनण्याची इच्छा त्यासाठी केलेला संघर्ष तसेच गरीबीतील आठवणींचे सत्यकथण त्यांनी कार्यक्रमात मांडल्याने सर्वजण भावूक झाले. जनतेशी असलेली नाळ पदावर असल्याने जपण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी कवित्व भावातून कर्तव्याचे धडे दिले.