भर उन्हात कांदा काढणीचं काम सुरू असताना महिला मजुराचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी?

आंबेगाव : राज्यात वाढत्या उन्हाचा फटका आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कांदा काढणीचे काम करत असताना एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तालुक्यातील हा पहिलाच संशयित बळी मानला जात आहे.

नकुशा बाळू सुपे असे मृत महिलेचे नाव असून त्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे शेतमजुरीसाठी आल्या होत्या. सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने त्या दुपारच्या तीव्र उन्हात शेतात काम करत होत्या. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

दरम्यान, राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून अनेक भागांतील तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून दुपारच्या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच रुग्णालयांमध्ये उष्माघातग्रस्तांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.