पुण्यात इन्स्टाग्राम स्टोरीवरून रक्तरंजित वाद; १८ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला


पुणे : सोशल मीडियावरील वाद किती टोकाला जाऊ शकतो, याची धक्कादायक घटना पुण्यातील वाकड परिसरात समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर टाकलेल्या बदनामीकारक स्टोरीचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ही घटना मंगळवारी (५ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास वाकडमधील माऊली चौक परिसरात घडली. याप्रकरणी वाकड येथील ४९ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर बदनामीकारक स्टोरी पोस्ट केली होती. त्याबाबत फिर्यादी महिलेच्या मुलाने आरोपीकडे जाब विचारला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी संगनमत करत तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय उर्फ सोन्या रामेश्वर पांचाळ (वय १८, रा. थेरगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सुरज भुजबळ (वय २२, रा. वाकड) आणि दोन अल्पवयीन मुलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!