बायकोला सांगितलं ‘ड्युटी’वर चाललोय अन् पबमध्ये दुसरीसोबतच ‘छमछम’; पुण्यातील पोलिसाचा कारनामा, पत्नीने रंगेहाथ पकडताच निलंबन

पुणे : ड्युटीवर कोम्बिंग ऑपरेशन असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या एका पोलीस हवालदाराचा प्रकार त्याच्या पत्नीमुळे उघडकीस आला आहे. पत्नीला खोटी माहिती देत दुसऱ्या महिलेसोबत पबमध्ये गेल्याचा आरोप संबंधित हवालदारावर करण्यात आला असून या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हवालदार हनुमंत गुलाब कांबळे (रा. वडकी) असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी पत्नीला ड्युटीचे कारण सांगून घराबाहेर पडत एका महिलेसोबत पबमध्ये वेळ घालवला. संशय आल्याने पत्नीने त्यांचा पाठलाग केला आणि पबमध्ये जाऊन त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, पत्नीने दिलेल्या तक्रारीत शारीरिक आणि मानसिक छळाचेही आरोप करण्यात आले आहेत. जाब विचारल्यावर पोलीस असल्याचा धाक दाखवणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे तसेच घटस्फोटाची धमकी देणे, असा त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त डॉ. सागर काकडे यांनी संबंधित हवालदाराच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.