पुणेकरांच्या खिशावर पुन्हा भार! सीएनजी दरवाढ लागू; आता प्रति किलोसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये


पुणे : पुणे शहर आणि परिसरातील वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली असून हे नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

या दरवाढीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सीएनजीचा दर आता प्रति किलो ९२ रुपये २५ पैसे झाला आहे. यापूर्वी हा दर ९० रुपये ७५ पैसे इतका होता.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, गॅस पुरवठ्यावरील ताण आणि आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विशेषतः अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या वाढीचा थेट फटका रिक्षाचालक, कॅब चालक आणि खासगी वाहनधारकांना बसणार असून वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या इंधन दरांमुळे आधीच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना, पर्यावरणपूरक इंधन मानल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरवाढीने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे पुण्यात रिक्षा भाडेवाढीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!