राज्यात पुढील 48 तास धोक्याचे! पाऊस, वीजांचा कडकडाट आणि उष्णतेचं ट्रिपल संकट; IMD चा मोठा इशारा

पुणे : राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसेच गोवा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागपूरसह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या काळात विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे देखील अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांत अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि उष्णता अशा तिहेरी संकटाचा सामना राज्याला करावा लागू शकतो.
