‘तू माझ्यासोबत आली नाहीस तर संसार मोडतो…’; नांदेडमध्ये नात्यालाच काळीमा, विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


नांदेड : “तू मला आवडतेस… माझ्यासोबत आली नाहीस तर तुझा संसार उद्ध्वस्त करेन,” अशी धमकी देत नात्यातील भावाकडून सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, बहीण-भावाच्या नात्यालाच काळीमा फासणारी ही घटना असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ऋतुजा सुधीर लोणे असे मृत विवाहितेचे नाव आहे. नुकताच तिचा विवाह झाला होता. मात्र विवाहानंतरही गावातील प्रफुल सुनील लोणे या तरुणाकडून तिचा सतत मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रफुल हा नात्याने ऋतुजाचा भाऊ लागत होता. तरीही तो वारंवार तिचा पाठलाग करत होता. “तू माझ्यासोबत आली नाहीस तर तुझा संसार मोडून टाकीन,” अशा धमक्या देत तो विवाहितेला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.

हा प्रकार ऋतुजाच्या माहेरी आणि सासरी समजल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये चिंता वाढली होती. गावात बदनामी होईल, संसारावर परिणाम होईल या भीतीतून ऋतुजा मानसिक तणावाखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. अखेर या त्रासाला कंटाळून तिने गावातील राजेश लोणे यांच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

ऋतुजा घरातून अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. काही तासांनी गावातील विहिरीत तिचं पार्थिव आढळून आलं आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रफुल सुनील लोणे याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात असून, विवाहितेच्या नातेवाईकांनी आरोपीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलांवरील मानसिक छळ आणि धमक्यांमुळे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याचं हे आणखी एक धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!