सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर मी…सुप्रिया सुळे यांचे साताऱ्यात मोठे वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना नवे वळण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व करावं, त्या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली आहे.

जय पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असून यावर विविध नेत्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून त्या साताऱ्यातील दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधत होत्या.
जय पवार यांच्या वक्तव्यानंतर बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ फ्लेक्स झळकले आहेत. “सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्य तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे,” असा आशय या फ्लेक्समध्ये नमूद करण्यात आला आहे. या फ्लेक्समुळे राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे.

सुप्रिया सुळे यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर त्यांचे स्वागतच असेल.” तसेच 2029 च्या निवडणुकीत कोण कुठून लढेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जय पवार काय म्हणाले होते?
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही बारामतीतील नागरिकांसह राज्यातील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे ती संधी मिळू शकली नाही. सध्या सुनेत्रा पवार या जनतेमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यामुळे 2029 च्या निवडणुकीत त्यांनीच उमेदवारी करून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली आहे.