“एका बुटानं उध्वस्त केला लग्नाचा रंग!” जालन्यात मस्करीचं रुपांतर तुफान राड्यात; मंडपातच धिंगाणा


जालना : लग्न म्हटलं की हशा, मस्करी आणि आनंदाचं वातावरण… पण जालन्यात एका लग्नसोहळ्यात मस्करीचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवण्याच्या किरकोळ कारणावरून लग्नमंडपात असा राडा झाला की, वऱ्हाडी थेट एकमेकांवर तुटून पडले. मारामारी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि गोंधळामुळे काही वेळ लग्नमंडप रणांगण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून जालना जिल्ह्यात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या नांदी गावात ३ तारखेला घडली. लग्नसोहळा मोठ्या उत्साहात सुरू असताना नवरीकडील मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवले. त्यानंतर मस्करी म्हणून नवरदेवाच्या भावाने नवरीची चप्पल लपवली. सुरुवातीला सगळं हसत-खेळत सुरू होतं, मात्र काही वेळातच वातावरण तापलं.

नवरीच्या काकाने संतापाच्या भरात नवरदेवाच्या भावाला ठोसा मारल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद सुरू झाला आणि काही क्षणातच वऱ्हाडी मंडळी एकमेकांवर तुटून पडली. लग्नमंडपातच धक्काबुक्की, मारामारी आणि गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून नवरदेवाने स्वतः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचंही काही चाललं नाही.

या राड्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात वधूपक्षातील ज्ञात आणि अज्ञात अशा १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गोंधळात नवरदेवाकडील ७ आणि १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रारही पोलिसांकडे देण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कळमकोंडा गावातही घडली होती. नवरदेवाचे बूट लपवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात थेट चाकूहल्ला झाला होता. त्यामुळे लग्नातील ‘बूट लपवण्याची मस्करी’ आता काही ठिकाणी गंभीर वादाचं कारण ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!