आता लग्नपत्रिकेतच लागणार ‘वयाचा हिशोब’! बालविवाह लपवणाऱ्यांची धावपळ वाढणार; सरकारचा कडक फटका


“पोरीचं वय कमी असलं तरी लग्न उरकून टाका…” अशी दबक्या आवाजात चालणारी गावाकडची चर्चा आता थेट कायद्याच्या जाळ्यात अडकणार आहे. कारण राज्य सरकारनं बालविवाह रोखण्यासाठी आता भन्नाट पण तितकंच कडक पाऊल उचललं आहे. राज्यात आता लग्नपत्रिकांवर वधू-वराच्या जन्मतारखा छापणं बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे खरं वय लपवून लग्न लावणाऱ्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं हा मोठा निर्णय घेतला असून, अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर अल्पवयीन मुलींना लहान वयातच मातृत्वाचं ओझं उचलावं लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे आयोगानं आता थेट अॅक्शन मोडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमामुळे लग्नाआधीच वधू-वराचं वय तपासणं प्रशासनासाठी सोपं होणार आहे. त्यामुळे संशयित बालविवाहांवर लगेच कारवाई करता येणार आहे. राजस्थानसारख्या काही राज्यांमध्ये आधीपासून असे नियम लागू आहेत आणि त्याचा चांगला परिणामही दिसून आला आहे. आता महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर नियम लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

फक्त मुलीच्या घरच्यांवरच नाही तर आता लग्नपत्रिका छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवाल्यांनाही जबाबदार धरलं जाणार आहे. वय तपासल्याशिवाय पत्रिका छापली किंवा मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलांचं लग्न लावलं तर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही आयोगानं दिला आहे.

याशिवाय आरोग्य, पोलीस, शिक्षण आणि महिला-बालविकास विभागाचं संयुक्त पथक तयार करण्यात येणार असून, अल्पवयीन मातांच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे बालविवाहांना आता थेट कायद्याचा चाप बसणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!