सरकारचे डावपेच ओळखा! 16 मे रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा करणार मनोज जरांगे पाटील यांचा इशारा


मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत राज्यात नव्या आंदोलनाची दिशा ठरवण्याचा इशारा दिला आहे. सरकार जाणूनबुजून विविध महामंडळांतील आणि योजनांतील वाद निर्माण करत असून त्यातून मराठा समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन मोठ्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, “कोण अध्यक्ष, कोण एमडी यांना अधिकार सरकारच देते. सरकारलाच काम होऊ द्यायचं नाही. सरकार अध्यक्ष आणि एमडी यांना बदनाम करण्याचा डाव रचत आहे. हे सगळे डावपेच आपण ओळखले पाहिजेत.” या राजकीय खेळीमुळे मराठा समाजाच्या तरुणांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील लाभार्थ्यांना वेळेवर व्याज परतावा मिळत नसल्याने मराठा युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक तरुण कर्जबाजारी होत असून त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “मराठ्यांच्या पोरांचं करिअर खराब होत आहे, कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे,” असे ते म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य करत शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे सांगितले. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी एकजूट दाखवणे हाच पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला कितीही वेळा सांगितले तरी प्रश्न सुटत नाहीत, त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी प्रक्रियेत सरकार जाणूनबुजून अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “कुणबी प्रमाणपत्र देण्यात विलंब होत आहे, ही मराठा समाजावर अन्यायाची पद्धत आहे,” असे ते म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असून 16 मे रोजी याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. हे आंदोलन केवळ मागण्यांसाठी नसून सरकारला उत्तर देणारे असेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!