तब्येत सुधारताच शरद पवार पुन्हा मैदानात; पहिला दौरा साताऱ्यात…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना बारामती विधानसभा निवडणुकीतील मतदानालाही मुकावे लागले होते. मात्र उपचारानंतर आता ते पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सक्रिय झाले आहेत.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आजारपणातून सावरल्यानंतर त्यांचा पहिला दौरा ऐतिहासिक सातारा शहरात होणार आहे. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते ८ मे रोजी साताऱ्यात पोहोचणार आहेत.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे ९ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता ते कर्मवीरांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. या स्मृतिदिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही पवार भूषवणार असून त्यांच्या हस्ते संस्थेतील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच ‘रयत मासिक’, ‘कर्मवीर सांगाती’ आणि ‘रयत विज्ञान पत्रिका’ या प्रकाशनांचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना‘ यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे पवार यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. साताऱ्याशी असलेले त्यांचे भावनिक आणि राजकीय नाते लक्षात घेता, ते कोणती भूमिका मांडतात याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे.

दरम्यान, या दौऱ्यात ते यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील ‘प्रतिसंगम’ स्मृतीस्थळाला भेट देणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र अनेक दिवसांनंतर पवार पुन्हा मैदानात उतरत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.