पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! तासभराचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत; जाणून घ्या कसा?

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा अत्याधुनिक भूमिगत दुमजली रिंग रोड उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे सिग्नलमुक्त असणार असल्याने शहरातील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.
या महाप्रकल्पासाठी अंदाजे ३२,१०५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून रिंग रोडची एकूण लांबी ५४.७८ किलोमीटर इतकी असणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग पूर्णपणे भूमिगत आणि दुमजली स्वरूपात विकसित केला जाणार आहे. या रस्त्यावरून ताशी सुमारे दोन लाख प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल, अशी क्षमता नियोजित करण्यात आली आहे.

सध्या दगडूशेठ परिसर, कोथरूड, येरवडा, कात्रज, सिंहगड रोड आणि सोलापूर रोड या भागांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना ४० ते ६० मिनिटांचा प्रवास करावा लागतो. मात्र हा भूमिगत रिंग रोड सुरू झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत पार करता येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे स्वारगेट, रेसकोर्स, पाषाण, येरवडा आणि कात्रज हे शहरातील महत्त्वाचे भाग थेट जोडले जाणार आहेत. परिणामी वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या संरेखनासाठी ‘मोनार्क’ या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पीएमआरडीएने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्राथमिक कामांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वाहन स्थापन केले जाणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर स्वतंत्र कंपनीमार्फत या महाप्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
वाढती वाहनसंख्या आणि अपुरी पडणारी रस्ते व्यवस्था यामुळे पुण्यात निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर हा भूमिगत दुमजली रिंग रोड भविष्यात शहराची नवी ‘जीवनरेखा’ ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.