पुण्यात संतापाचा उद्रेक! ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार; नराधम आजोबा पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला असताना आणखी एक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या नऊ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

सुदैवाने, परिसरातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका नराधमाने दारूच्या नशेत माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या.
आपल्या घरात असलेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित बालिकेला पाहून अश्लील हावभाव करणे आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करणे, असा निंदनीय प्रकार आरोपी जाधव याने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा आरोपी पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. आजोबांसारख्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे कुटुंबासह संपूर्ण वस्ती हादरून गेली आहे.

चिमुकलीच्या ओरडण्यामुळे किंवा नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठ्या संख्येने गोळा होऊन आरोपीला पकडले. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या घरातच असा प्रकार घडल्याने आता लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.