व्हॉट्सॲपचा मोठा धक्का! युजर्सचं आवडतं फीचर कायमचं बंद; आता करता येणार नाही ‘ही’ गोष्ट


पुणे : जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp पुन्हा एकदा मोठ्या बदलामुळे चर्चेत आले आहे. कंपनीने यावेळी आपल्या प्लॅटफॉर्मवरील ‘अवतार’ हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. Meta Platforms कडून हे फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

हा बदल एकाचवेळी सर्वांना लागू न होता हळूहळू रोलआउट केला जात आहे. कंपनीकडून अधिकृत कारण सांगितले गेले नसले तरी, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कमी वापरामुळे हा निर्णय घेतला असावा. सुरुवातीला Bitmoji प्रमाणेच या फीचरला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात वापरकर्त्यांनी इमोजी आणि स्टिकर्सलाच अधिक पसंती दिली.

WABetaInfo च्या माहितीनुसार, अनेक युजर्सच्या सेटिंग्जमधून ‘अवतार एडिट’ करण्याचा पर्याय आधीच गायब झाला आहे. काहींना हा पर्याय अजून दिसत असला तरी लवकरच तोही पूर्णपणे हटवला जाणार आहे. यामुळे आता स्वतःचा चेहरा, कपडे किंवा हेअरस्टाईल बदलून नवीन डिजिटल अवतार तयार करता येणार नाही.

हा बदल फक्त सेटिंग्जपुरता मर्यादित नसून चॅट विंडो, प्रोफाइल स्क्रीन आणि कीबोर्डमधूनही अवतार तयार करण्याची सुविधा काढून टाकली जात आहे. एकेकाळी कस्टम स्टिकर्स तयार करण्यासाठी लोकप्रिय असलेले हे फीचर आता पूर्णपणे बंद होणार असल्याने अनेक वापरकर्त्यांची निराशा झाली आहे.

मात्र, एक दिलासादायक बाब म्हणजे याआधी तयार केलेले अवतार स्टिकर्स पूर्णपणे डिलीट होणार नाहीत. ते ‘Recent’ किंवा ‘Favourite’ सेक्शनमध्ये सेव्ह राहतील. वापरकर्ते हे जुने स्टिकर्स पाठवू शकतील, पण त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत किंवा नवीन स्टिकर्स तयार करता येणार नाहीत. तुमच्या फोनमध्ये हे फीचर सध्या दिसत असले, तरी पुढील काही दिवसांत ते पूर्णपणे हटवले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!