लालपरीत मोठा बदल! 1 जूनपासून शौचालये फ्री, स्वच्छतेला टॉप प्रायोरिटी

महाराष्ट्र: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी लालपरी आता नव्या रूपात दिसणार आहे. अनेक वर्षांपासून एसटी स्थानकांवरील अस्वच्छतेबाबत प्रवाशांच्या तक्रारी होत्या, पण आता त्यावर मोठा निर्णय घेत सरकारने कंबर कसली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्याप्रमाणे, येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवरील शौचालये प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत केली जाणार आहेत. त्यामुळे “शौचालयासाठी पैसे मोजा” हा त्रास आता संपणार आहे.
यासोबतच स्वच्छतेवरही विशेष भर देण्यात येणार आहे. बस स्थानक परिसर दर 4 तासांनी साफ करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून प्रत्येक बस सेवेत जाण्यापूर्वी ती आतून आणि बाहेरून स्वच्छ असल्याची खात्री केली जाणार आहे.

या सगळ्या व्यवस्थेसाठी प्रवाशांच्या तिकीटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार लावण्यात येणार असून त्यातून व्यावसायिक कंत्राटदारांमार्फत स्वच्छता राखली जाणार आहे.

फक्त स्वच्छतेपुरतेच नव्हे, तर प्रवाशांसाठी बस स्थानकांवर वाचनालयांची सुविधा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. चालक आणि वाहकांसाठीही विश्रांतीच्या सोयी सुधारण्यात येणार आहेत.
1 जून हा एसटीचा वर्धापन दिन असल्याने याच दिवशी या सर्व सुविधा लागू होणार आहेत. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास अधिक स्वच्छ, आरामदायी आणि सन्मानजनक होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.