मोठी बातमी! पश्चिम बंगालसह 5 राज्यांचे एक्झिट पोल जाहीर; राजकीय समीकरणात मोठा उलटफेर, जनतेचा कौल काय?

नवी दिल्ली : आज पश्चिम बंगाल विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून त्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. मॅट्रिझ, चाणक्य आणि पोल डायरी यांसारख्या संस्थांच्या अंदाजांनुसार अनेक राज्यांमध्ये धक्कादायक चित्र दिसत आहे.

पश्चिम बंगालमध्ये मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 146 ते 161 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागांपर्यंत समाधान मानावे लागेल असा अंदाज आहे. यामुळे राज्यात ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसारही भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज असून तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागा मिळू शकतात. तर पोल डायरीनुसार भाजपला 142 ते 171 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आसाममध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार असल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. एक्सिस माय इंडिया पोलनुसार भाजपला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागेल.

केरळमध्ये मात्र धक्कादायक कल समोर आला आहे. येथे काँग्रेस आघाडीला 78 ते 90 जागा मिळण्याचा अंदाज असून एलडीएफला 49 ते 62 जागांपर्यंत मर्यादित राहावे लागू शकते. भाजपच्या वाट्याला अवघ्या 3 जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या एक्झिट पोलमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अंतिम निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.