लालभडक कलिंगड खावं की खाऊ नये?; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा!

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने मृत्यू झाल्याची चर्चा रंगली असून बाजारातही कलिंगड खरेदीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर कलिंगड खाणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

Grant Government Medical College चे उपअधिष्ठाता डॉ. तुषार पालवे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कलिंगड खाल्ल्याने थेट मृत्यू होत नाही; मात्र चुकीच्या पद्धतीने साठवलेले किंवा रसायनयुक्त फळ खाल्ल्यास आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
उन्हाळ्यात कापलेले कलिंगड ६ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणे टाळावे. उष्णतेमुळे त्यात जंतू वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कापलेले कलिंगड शक्यतो ताजेच खावे, असा सल्ला त्यांनी दिला.

तसेच, कलिंगड विकत घेताना फक्त लाल रंग पाहून निर्णय घेऊ नये. कापल्यानंतर कलिंगड लाल दिसत असले तरी ते गोड नसेल, तर ते कृत्रिमरीत्या पिकवलेले असण्याची शक्यता असते. अशा फळांचे सेवन टाळावे, असेही त्यांनी सांगितले. पायधुनीतील घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी योग्य काळजी घेतल्यास कलिंगड खाणे सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
