सुपीक जमीन, पुण्यात फ्लॅट्स अन् कर्नाटकात आश्रम; भोंदू मनोहर भोसलेच्या मालमत्तेचा भांडाफोड, आकडा पाहून डोळे फिरतील…

पुणे : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याच्या अफाट संपत्तीचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अल्पावधीत उभारलेल्या या मालमत्तेच्या जाळ्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

सोलापूर, अहिल्यानगर, पुणे आणि थेट कर्नाटक पर्यंत त्याची मालमत्ता पसरलेली असल्याचे समोर आले आहे. कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे त्याच्या नावावर तब्बल २५ एकर सुपीक शेती असल्याची नोंद सातबाऱ्यावर आढळून आली आहे.
कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या या भागात जमिनीचे दर प्रति एकरी २० ते २५ लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे केवळ या ठिकाणीच ५ ते ६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा रंगली आहे.

मनोहर भोसलेने स्वतःच्या नावाबरोबरच कुटुंबीयांच्या नावावरही मोठी मालमत्ता जमा केल्याचे समोर आले आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथे त्याची पत्नी रूपाली भोसले हिच्या नावावर सुमारे २७ एकर बागायती जमीन आहे. तसेच त्याचे मूळ गाव उंदरगाव येथे वडील चंद्रकांत भोसले यांच्या नावे असलेल्या जमिनीवर मोठा मठ उभारण्यात आला आहे. हा मठ त्याच्या कारवायांचे केंद्र असल्याचा आरोप होत आहे.

ग्रामीण भागाबरोबरच शहरातही त्याची मजबूत पकड असल्याचे दिसून येते. पुण्यातील मांजरी आणि हडपसर परिसरात त्याचे आलिशान फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गाणगापूर येथे भव्य आश्रमाचे बांधकाम सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
काही वर्षांपूर्वी सामान्य आयुष्य जगणारा हा व्यक्ती अचानक कोट्यवधींचा मालक कसा झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत दक्षिणा उकळणे, भीती दाखवून पैसे उकळणे आणि जमिनीचे व्यवहार यामधूनच ही संपत्ती उभी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.चिलवडी येथील सातबाऱ्याची माहिती समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.