मरळवाडीने दिला विश्वासाचा कौल; दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दिपाली आंधळे दणदणीत विजयी..

पुणे : मरळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नी दिपाली आंधळे यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा ४३५ मतांनी दणदणीत पराभव करत विजय मिळवला. या निकालातून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आंधळे कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याची चर्चा आहे.

दिवंगत बापू आंधळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित मरळवाडी गावातील प्रभावी सरपंच म्हणून ओळखले जात होते. गावाच्या विकासकामांत त्यांचा मोठा वाटा होता. मात्र २९ जून २०२४ रोजी रात्री परळी येथील बँक कॉलनी परिसरात त्यांची निर्घृण हत्या झाली होती, ज्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता.
आर्थिक व्यवहाराच्या वादातून त्यांना बोलावून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले. “पैसे आणलेस का?” या वादातून परिस्थिती चिघळली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांनी पिस्तूलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप FIR मध्ये नमूद आहे. त्याचवेळी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्याने हल्ला केल्याचेही उघड झाले. या हल्ल्यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती.

याच पार्श्वभूमीवर पतीच्या अपूर्ण स्वप्नांना न्याय देण्यासाठी दिपाली आंधळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. “बापूंचे स्वप्न, गावाचा विकास आणि न्यायाची लढाई” हा संदेश त्यांनी प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. महिला, युवक आणि ज्येष्ठ मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला.
मतमोजणीत त्यांनी विरोधक पद्मिनीबाई आंधळे यांचा पराभव करत विजय मिळवला. हा निकाल केवळ निवडणुकीचा विजय नसून अन्यायाविरुद्ध गावकऱ्यांनी दिलेला ठाम संदेश मानला जात आहे.
मरळवाडीत पुन्हा एकदा आंधळे कुटुंबाचे राजकीय वर्चस्व सिद्ध झाले असून ग्रामपंचायतीच्या सत्तेवर त्यांची पुनर्स्थापना झाली आहे. गावकऱ्यांच्या मते, हा विजय म्हणजे दिवंगत बापू आंधळे यांच्या कार्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे.