केडगावात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठरली घातक; तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान कथित निष्काळजीपणामुळे २२ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

मृत महिलेचे नाव रंजना केसकर (रा. खोर, ता. दौंड) असे आहे. त्यांना दोन वर्षांची मुलगी आणि एका वर्षाचा मुलगा आहे. शनिवारी (ता. २५) केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शस्त्रक्रिया शिबिरात त्या दाखल झाल्या होत्या. सकाळी शस्त्रक्रिया पार पडली; मात्र काही वेळातच त्यांच्या पोटात तीव्र रक्तस्राव सुरू झाला.
या प्रकरणात शस्त्रक्रियेदरम्यान गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून शल्यचिकित्सक डॉ. अनिल कदम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यामुळेच रक्तस्राव वाढला आणि वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना प्रथम नानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर पुढे खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तस्राव थांबत नव्हता आणि रक्तदाब वाढत नव्हता असे स्पष्टीकरण दिले असले, तरी हा निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. साध्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या महिलेचा जीव कसा गेला? असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात गोंधळ घालत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः डॉ. अनिल कदम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, इतकी गंभीर घटना घडूनही यवत पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत तक्रार नोंद झालेली नसल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.