उन्हाचा कहर! उष्माघाताने दोघांचा मृत्यू; पुण्यासह राज्यात नागरिक त्रस्त…

पुणे : राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे.

सोमवारी उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहिल्यानगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी भर उन्हात गेलेल्या भावाचा उष्माघातामुळे रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. दिगंबर जनार्दन वाकचौरे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते कळस येथून संगमनेर येथे दुचाकीवरून आले होते.

उन्हाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांनी थंड पाणी डोक्यावर ओतले. मात्र, त्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली. विवाहसोहळ्यानंतर घरी न परतलेल्या लोधू नामदेव पाटील (६०) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी एसटी कार्यशाळेजवळ आढळून आला. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे उष्माघाताचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान ४४.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
दरम्यान, पुणे शहरातही उष्णतेची तीव्रता कायम आहे. सकाळपासून वाढणाऱ्या उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात ३९.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान, तर शिवाजीनगर येथे हंगामातील उच्चांकी २४.७ अंश किमान तापमान नोंदवले गेले.