धक्कादायक! “लग्न जुळवतो, तुझी मदत करतो” म्हणत तरुणीवर वर्षभर अत्याचार; दोघांना अटक

अमरावती : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शहरातून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मदतीच्या बहाण्याने एका महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

तुटलेलं लग्न पुन्हा जुळवून देतो, असे आमिष दाखवत आरोपींनी महिलेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं वर्षभरापूर्वी लग्न तुटलं होतं. संबंधित तरुणाने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिच्याशी संपर्क साधला.

आरोपींनी “तुझे संबंध पुन्हा जुळवून देतो” असे खोटे आश्वासन देत तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर महिलेच्या घरी जाऊन ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घडलेला प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी रियाजोद्दीन आणि वसीम या दोन आरोपींना अटक केली आहे. याबाबत माहिती देताना अमरावती शहराचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.