दारूच्या नशेत टोकाचं पाऊल; थेऊरमध्ये रिक्षाचालकाची आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू…

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

गणेश शिवाजी पवार (वय ४०, रा. थेऊर) असे मृताचे नाव आहे. पवार हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना मद्यपानाचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री ते नशेत घरी परतले आणि घरच्यांशी वाद झाल्याने कुटुंबीय शेजारीकडे गेले होते.
दरम्यान, उशिरा परत आल्यानंतर घराचा दरवाजा अर्धवट उघडा आणि लाईट बंद असल्याचे दिसून आले. आत पाहिले असता पवार यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांना खाली उतरवले आणि पोलिसांना माहिती दिली.

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पवार यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहेत.