भोंदू मनोहर मामा भोसले पुन्हा जेरबंद; कुर्डूवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, लाखोंच्या फसवणुकीचा पर्दाफाश…


सोलापूर : स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगून भक्तांची फसवणूक करणाऱ्या मन्या उर्फ मनोहर मामा भोसलेच्या मुसक्या पुन्हा एकदा आवळण्यात आल्या आहेत. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी सोलापूर ग्रामीणच्या कुर्डूवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत मनोहर भोसलेने एका भक्ताकडून पूजेच्या नावाखाली २ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ५० हजार रुपये त्याने स्वीकारले. मात्र, फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने संबंधित भक्ताने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर कुर्डूवाडी पोलिसांनी आर्थिक फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी

मनोहर भोसलेवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच कॅन्सरसारखे आजार बरे करण्याचा खोटा दावा करत लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.

याशिवाय बारामती परिसरातही त्याच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. पूर्वीच्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारच्या कृत्यांना सुरुवात केल्याचे समोर आले आहे. त्याच्या तथाकथित ‘दर्शनासाठी’ व्हीआयपी आणि उच्चभ्रू वर्गातील लोकांचीही गर्दी होत असल्याची माहिती आहे.

पोलिसांचे आवाहन

सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागात मिळून भोसलेवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. कुर्डूवाडीतील तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!