एलपीजी सिलिंडरबाबत मोठी अपडेट; नवीन गॅस कनेक्शन मिळणं सध्या कठीण

पुणे : देशातील सार्वजनिक इंधन कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅसच्या नव्या जोडण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या आहेत. मागील महिनाभरापासून हा निर्णय लागू असून, ही बंदी कधी उठवली जाईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सीएनबीसी च्या अहवालानुसार, गॅसच्या उपलब्धतेत निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात दरवर्षी सुमारे ३३ दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो, ज्यापैकी जवळपास ६५ टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते.
भारत मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियातील देशांकडून एलपीजी आयात करतो. त्यामुळे त्या भागातील अस्थिरतेचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर होत असतो. सध्या इराण-इस्रायल संघर्ष वाढल्याने सागरी वाहतुकीवर परिणाम झाला असून, पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

जगातील महत्त्वाचा तेल-गॅस वाहतुकीचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी या परिस्थितीमुळे संवेदनशील ठरली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर निर्माण झालेल्या अडचणींचा फटका भारतीय तेल कंपन्यांना बसत आहे.

दरम्यान, सध्याच्या ग्राहकांना गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंपन्यांनी प्राधान्य दिले आहे. विद्यमान ग्राहकांना सिलिंडरची कमतरता भासू नये, यासाठीच नवीन जोडण्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
यामुळे नव्याने घरात स्थलांतर करणारे नागरिक तसेच पहिल्यांदाच गॅस घेऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण कुटुंबांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.