राष्ट्रवादीत मोठा निर्णय! सुनेत्रा पवारांकडून कुटुंबात तिहेरी जबाबदारी वाटप; नेमकं काय घडलं?

पुणे : सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजासाठी मोठा निर्णय घेत जबाबदाऱ्यांचे तिहेरी वाटप जाहीर केले आहे. या नव्या नियोजनानुसार सुनेत्रा पवार स्वतः राज्यभर फिरून पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईतील पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची सूत्रे देण्यात आली आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. काही ज्येष्ठ नेते पक्षाची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य राजकीय घडामोडी टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची प्रमुख सूत्रे कुटुंबाकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही अधिक सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर निवडून गेले असून जय पवार यांनी बारामतीत आपला जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.
