शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! खरीप पीक विमा भरपाई मंजूर; तुमच्या खात्यात किती रक्कम येणार? जाणून घ्या…

पुणे : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी १,२१९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.

या भरपाईत कापूस आणि तूर वगळता इतर पिकांचा समावेश करण्यात आला असून, सोयाबीन पिकाला सर्वाधिक लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या भरपाईत सर्वाधिक ८१३ कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले आहेत. इतर जिल्ह्यांनाही नुकसानाच्या प्रमाणानुसार मदत वितरित केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांसाठीची भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पिकांच्या शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे ९८ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टर १७ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

पीक कापणी प्रयोगांवर आधारित भरपाई…
पीकविमा योजनेतून दिली जाणारी भरपाई ही पीक कापणी प्रयोगांवर आधारित आहे. राज्यातील सुमारे १२ हजार महसूल मंडळांमधील उत्पादनाची सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. उत्पादन घटले असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
७,५०० महसूल मंडळांची माहिती पूर्ण..
एकूण १२ हजार महसूल मंडळांपैकी सुमारे ७,५०० मंडळांची माहिती अंतिम करण्यात आली आहे. विमा कंपन्यांनी याला सहमती दर्शवल्यानंतर भरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित मंडळांची माहिती लवकरच पूर्ण होणार आहे.
नुकसानभरपाईत प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. राज्यात सुमारे ३५ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा विमा उतरविण्यात आला होता, त्यामुळे या पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकसानभरपाईत नांदेडनंतर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणानुसार मदत वितरित केली जात आहे.