पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडी चौकातील सध्याचे दोन्ही धोकादायक दुभाजक कायमस्वरूपी बंद; पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याला यश…

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडी चौकातील सध्याचे दोन्ही धोकादायक दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. अपघातांचा धोका कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. प्रशासनाने सोमवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून या नव्या नियोजनामुळे महामार्गावरील तसेच वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम मिळणार आहे.

या महामार्गावरील नायगाव चौक आणि कुंजीरवाडीकडे जाणारा चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत होत्या. परिसरातील नर्सरी, सिमेंट पाईप कंपन्या आणि इतर उद्योगांमुळे होणारी अवजड वाहने कोंडीत भर घालत होती. ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक नागरिक वारंवार पाठपुरावा करत होते.
वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार, नायगाव फाटा आणि कुंजीरवाडी चौक हे दोन्ही धोकादायक दुभाजक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी कुंजीर लॉन्ससमोर, मोरया वन सोसायटीसमोर, भारत बेंझ शोरूम (जुने) पतसंस्थे शेजारी अशा ठिकाणी हे नवीन डिव्हायडर सुरक्षिततेच्या सर्व निकषांनुसार तयार केले जाणार असून, वाहनांना वळण घेण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन वाहनांचा वेगही कायम राखता येणार आहे. हे नवीन दुभाजक ‘यू-टर्न’ घेण्यासाठी पुरेसे प्रशस्त असून, त्यामुळे वाहनांना वळण घेताना कसलाही त्रास होणार नाही.

यासाठी वाहतूक उपायुक्त हिंमत जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करनकोट तसेच राजकीय लोकप्रतिनिधी आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा पुनम चौधरी,
पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यादींनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार वाहतुक बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.

उरुळी कांचन शहरातील वाहतुक बदलासाठी तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी चौकातील मुख्य दुभाजक बंद करुन वाहतुक बदलाचा निर्णय घेतल्याने वाहतुक कोंडीचे परिणामकारक चित्र दिसून आल्याने आळंदी व कुंजीरवाडी चौकातील वाहतूक बदलाचे परिणामकारक चित्र दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच नव्या दुभाजकांमुळे महामार्गावरील वाहनांचा वेग कायम राहील आणि अपघातांचे प्रमाण शून्यावर येईल, अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठसह परिसरातील नागरिकांची नायगाव येथील दुभाजक बंद करण्याची मागणी होती. त्यानुसार वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. पोलीस अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्या पाठपुराव्यानुसार दुभाजक बंद करण्यात आले आहेत.अशी माहिती -राजेंद्र करणकोट (पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा)यांनी दिली.