खरात प्रकरणी नाशिकचे IG वादाच्या भोवऱ्यात! अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट, तब्बल 18 फोन कॉल अन्…

मुंबई : महिलांचें लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्याची व्याप्ती आता वाढतच आली आहे.राज्यातील आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या. त्यानंतर आता नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्याशी कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट करत नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.खरात प्रकरणी त्यांची देखील चौकशी विभागीय दक्षता विभागांकडून झाली पाहिजे, अशी मागणी देखील दमानिया यांनी केली आहे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. याचे उत्तर पोलिस महासंचालक सदानंद दाते सरांनी घेतलं पाहिजे, असंही दमानिया या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
दरम्यान अंजली दमानिया यांनी ट्विट करत कराळे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दत्ता कराळे हे एक आयजी लेवलचे पोलिस अधिकारी असतांना खरात सारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातवर विश्वास का नाही बसणार? असा सवाल त्यानी उपस्थित केला आहे.

खरात प्रकरणी विशेष तपास पथकाने देखील तपासाचा वेग वाढवला असून यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यापूर्वी देखील खरातच्या संपर्कात दोन महिला अधिकारी आल्या होत्या.दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील विचारला जात आहे.
