हवेली तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ‘जलतारा’ प्रकल्प राबविणे काळाची गरज- सभापती युवराज काकडे


पुणे : हवेली तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता गावागावात ‘जलतारा’ प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे मत, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी व्यक्त केले.

हवेली पंचायत समितीत या अभियानाची ‘विशेष आढावा’ बैठक ‘जलतारा’ प्रकल्पाचे जनक जलतज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून गावागावातील विहिरींनी तळ गाठला आहे. तर बोअरवेल ही बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. त्यामुळे अनेक गावात दिवसाआड पाणी नागरिकांना मिळत आहे. त्यावर ‘जलतारा’ प्रकल्प हा अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. या प्रकल्पावर महाराष्ट्र शासनाचे योजना तयार करण्याचे काम सुरू असून, येणाऱ्या काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी, ही योजना अत्यंत प्रभावी योजना ठरणार आहे.

‘जलतारा’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे आणि भूजल पुनर्भरण करणे हा आहे. जलतारा प्रणालीमध्ये जमिनीच्या सर्वात उतार भागावर सुमारे ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ६ फूट खोल आकाराचा खड्डा खोदला जातो. या खड्ड्यांमध्ये दगड, गोटे टाकून तो खड्डा बुजविला जातो. खड्डा बुजवताना साधारणपणे एक फूट वरची जागा रिकामी ठेवली जाते. त्यामुळे पावसाचे पाणी या खड्ड्यात सहजरीत्या जमा होते आणि झिरपून ते जमिनीत मुरते व जमिनीच्या पाणी पातळीत चांगली वाढ होते, असे ‘जलतारा’ प्रकल्पाचे जनक जलतज्ञ डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी सांगितले.

हवेली तालुका हा पुणे शहराच्या जवळ असुन सुद्धा अनेक गावागावात उन्हाळ्यात पाणी टंचाई आहे. त्यामुळे जलतारा योजना राबविली तर भूजल पुनर्भरण, सिंचन सुधारणा आणि शेती उत्पादन वाढते. भूजल पातळीतही १० ते १५ फुटांची वाढ होते. तसेच अतिवृष्टीतून पाणी साचणे टाळून, पिकांचे संरक्षण होते, वर्षभर सिंचन सुविधाही चांगल्या प्रकारे उपलब्ध होते.

‘जलतारा’ ही योजना, महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची जलसंधारण योजना म्हणून पुढील काळात समोर येणार असून, याचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी साठवणे आणि भूजल पातळी वाढविणे हा असणार आहे.

सध्या हा प्रकल्प शासन स्थरावर मान्यतेच्या प्रतिक्षेत असल्याने, हा प्रकल्प तूर्तास हवेली तालुक्यात राबविण्यासाठी, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली, हवेली तालुक्यातील सामाजिक संस्था, CSR कंपन्यांच्या व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्याचा, हवेली पंचायत समितीचा विचार असुन, यासाठी गावागावातील होतकरू तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, हवेली तालुक्याची पाणी टंचाई दुर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती युवराज काकडे यांनी केले.

यावेळी उपसभापती विद्याताई गायकवाड, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई कोंडे, कोमलताई आव्हाळे, शितलताई कांबळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, पंचायत समिती सदस्य युवराज वांजळे, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, सुषमाताई मुरकुटे, कोमलताई कांबळे, राणीताई वाळके यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी व गावोगावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!