मोठी बातमी! बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार, आता निवडणूक बिनविरोध होणार?

बारामती : राज्यातील सर्वांचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीकडून काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी सतत गाठीभेटी आणि चर्चा सुरू होत्या. अखेर काँग्रेसकडून सकारात्मक संकेत मिळत असून, आज दुपारपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली असून अनेकांनी माघार घेण्याची भूमिका मांडली आहे. प्रदेशाध्यक्षांकडे ही भूमिका पोहोचवण्यात आली असून, अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीनंतर घेतला जाणार आहे. यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता अधिकच वाढली आहे.

बारामतीतील पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्ज परत घेण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत. याच काळामध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी शरद पवार यांनी चर्चा केली आहे त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करत विनंती करत बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये अंतर्गत खलबतं देखील सुरू झाली आहेत.
तर या सर्व घडामोडींवरती भाष्य करताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना सांगितलं, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीत लढवत आहेत, तेथील एकूण परिस्थिती पाहता आणि आमच्या सगळ्यांची भावना लक्षात घेता तिकडे या निवडणुकीमध्ये पुढे जाणं थांबावं अशा प्रकारची भावना भूमिका दिसली, त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं एकमत झालं आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत, कदाचित मलाही फोन येईल, विचारणा होईल आणि त्यांच्या कानावर टाकूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून वारंवार विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. यापूर्वीही अशा निवडणुका झाल्या असल्या तरी अनेक वेळा भारतीय जनता पक्षाने त्याचे पालन केले नाही, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत मोठा आदर व प्रेम असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका अनेक नेत्यांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सविस्तर चर्चा करून हाय कमांडकडे प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय नेतृत्वाचा आदेश मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तसेच, पक्षातील भावना आणि भूमिका हाय कमांडसमोर मांडण्यात आल्या असून, त्यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.