पुण्यातील वॉटरपार्कमध्ये हादरवणारा अपघात! महिला पर्यटकावर गंभीर परिणाम, नेमकं घडलं काय?

पुणे : पुणे जिल्ह्यातील एका नामांकित वॉटरपार्कमध्ये घडलेल्या गंभीर अपघाताने खळबळ उडाली आहे. वॉटर स्लाइडचा आनंद घेत असताना एका पर्यटक महिलेचा तोल जाऊन ती जोरात आपटली. या अपघातात तिच्या शरीराच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी ती कायमस्वरूपी अंशतः अपंग झाल्याचे स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर महिलेवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र या प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्लाइडची रचना, सुरक्षा उपाययोजना आणि कर्मचाऱ्यांची दक्षता याबाबत प्रशासनाने चौकशी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने नागरिक मोठ्या संख्येने वॉटरपार्ककडे वळत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी संदीप नप्ते (वय 37) आपल्या कुटुंबासह पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेले होते. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी खूपच कमी असल्याने त्या जोरात खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या.
घटनेनंतर वॉटरपार्कमध्ये तातडीची वैद्यकीय मदत किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. परिणामी, नातेवाईकांना अश्विनी संदीप नप्तेंना त्वरित खासगी रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेणे भाग पाडले गेले.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेच्या पाठीच्या चार मणक्यांमध्ये गंभीर तुटलेपणा असल्याचे सांगितले. या गंभीर दुखापतीमुळे तिच्या शरीराचा खालचा भाग कायमस्वरूपी निकामी झाला आहे. या अपघातानंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी महिलेचे नातेवाईक किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा तयार केला असून, सद्यस्थितीत पुढील तपास सुरू आहे.