बीडमधील महेश आत्महत्या प्रकरणाचं भयानक वास्तव; मित्रांन एका वाढदिवसाला न बोलवल्याची खंत मृत्यूला गाठली..

पुणे : अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे एका 24 वर्षीय तरुणाने स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या तरुणाने आत्महत्या का केली याचं भयानक वास्तव आता समोर आल आहे. एका मित्राने वाढदिवसाला न बोलवल्याच्या कारणाने त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील महेश उद्धव भणगे या तरुणाने वाढदिवसाला न बोलावण्याच्या कारणावरून विष प्राशन केल आणि आपलं आयुष्य संपवलं.ही घटना वरवर पाहता क्षुल्लक कारणावरून घडल्यासारखी वाटत असली, तरी ती आजच्या पिढीच्या मानसिक स्थितीचं अस्वस्थ चित्र उभं करते.
सोशल मीडियावर दिसणारी ‘परफेक्ट’ मैत्री, सेलिब्रेशन आणि गटांमधील स्वीकार या सगळ्यांच्या मोह मायेच्या जगात अनेक तरुण स्वतःला हरवताना दिसत आहेत. ‘मला का नाही बोलावलं?’ हा प्रश्न काही वेळा आत्मसन्मानावर घाव घालतो, आणि त्यातूनच एकटेपणा, नाकारलेपण आणि नैराश्य वाढत जातं. महेश ला देखील हा नाकारलेपण जिव्हारी लागल्याने त्यांन टोकाचे पाऊल उचललं.

महेशने आत्महत्येपूर्वी मोबाईलवर ठेवलेलं “माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” हे स्टेटस आजच्या समाजासाठी आरशासारखं आहे. या तरुणाने उचलेल हे पाऊल विचार करायला लावण्यासारख आहे.आपल्या आसपास कितीतरी ‘महेश’ असू शकतात, जे हसत असतात, पण आतून तुटत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही.
या घटनेनंतर कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत असताना आपण खरंच एकमेकांसोबत आहोत का, की फक्त ‘ऑनलाईन’ जोडलेले आहोत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोशल मीडियाच्या या जगात मानसिक आरोग्य, संवादाचा अभाव, स्पर्धात्मक जीवनशैली आणि सामाजिक दडपण यामुळे तरुणाई अधिक संवेदनशील बनत चालली आहे. त्यामुळे यासारखी टोकाची पावले उचलली जात आहेत.
अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने उभे केलेले प्रश्न केवळ तपासाने मिटणार नाहीत. त्यासाठी समाजानेच अंतर्मुख होण्याची गरज आहे. कोणत्याही मानसिक तणावाखाली न राहता आलेलं दडपण एकमेकांना शेअर करून त्यातून मार्ग काढून जीवन आनंदाने जगा…