मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका, ‘त्या’ पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, पत्रात नेमकं काय?


बीड : बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेला धोका असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्याकडूनच सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे नमूद केले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, या आरोपांनंतर प्रज्ञा खोसरे यांनी आक्रमक भूमिका घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, संबंधितांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रात प्रज्ञा खोसरे यांच्यावर अनेक गंभीर आणि धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या पत्रानुसार, त्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रतिनिधी म्हणून काम करत असून महिलांना त्याच्याकडे नेण्याची भूमिका बजावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, प्रज्ञा खोसरे यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोपही पत्रात नमूद आहे. या संदर्भात 2009 साली बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, त्यांनी काही वेळा गर्भलिंग निदान करून गर्भपात केल्याचा आणि इतर महिलांनाही पुत्रप्राप्तीसाठी किंवा गर्भलिंग तपासणीसाठी विविध डॉक्टरांकडे नेल्याचा खळबळजनक आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. मात्र, या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, प्रज्ञा खोसरे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

या पत्रात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, प्रज्ञा खोसरे यांनी रूपाली चाकणकर यांच्या माध्यमातून चुकीची माहिती देत बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षपद मिळवले. तसेच त्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या वादग्रस्त आरोपांच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या कृतीमुळे राज्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि सामाजिक प्रतिष्ठेला धोका निर्माण झाल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रज्ञा खोसरे यांना तातडीने सर्व पदांवरून हटवावे, अशी मागणीही या निनावी पत्रातून करण्यात आली आहे.

या आरोपांनंतर प्रज्ञा खोसरे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ निनावी पत्र व्हायरल करून माझी बदनामी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मी अशोक खरातचा जाहीर निषेध करते आणि त्याला कडक शिक्षा व्हायलाच हवी, ही माझी ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन खालच्या दर्जाची टीका करत आहेत, असा आरोपही प्रज्ञा खोसरे यांनी केला.

प्रज्ञा खोसरे यांनी पुढे सांगितले की, दादा गेल्यानंतर सुनेत्रा वहिनींना आम्ही आमचे सर्वस्व मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार ग्राऊंड लेव्हलवर काम करत आहोत. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवितास धोका असल्याचा आरोप करणे पूर्णपणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निनावी पत्रामुळे केवळ सुनेत्रा पवार यांचीच नव्हे, तर बीड जिल्ह्याची आणि महिलांची बदनामी होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, ज्यांनी हे कारस्थान रचले आहे त्यांच्याविरोधात लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या पत्रामागे नेमके कोण आहे याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!