धक्कादायक! आईनेच १६ वर्षांच्या लेकीचा सौदा; पैशांसाठी लग्न, पण मुलगीच बेपत्ता…बीडमध्ये नेमकं काय घडलं?


बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या मोहापायी एका आईने आपल्या अवघ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा सौदा करत तिचे लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक फायद्यासाठी संबंधित आईने एका व्यक्तीकडून पैसे स्वीकारून मुलीचे लग्न लावले. मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही हा निर्णय घेण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक गंभीर बाब म्हणजे विवाहानंतर संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाली असून तिला अज्ञात ठिकाणी पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या गंभीर प्रकरणाची माहिती चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) वर मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. संबंधित यंत्रणांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत मुलीचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय केली असून तपासाला वेग दिला आहे.

यासोबतच, या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने संबंधित मुलगी आणि तिच्या आईचा शोध घेऊन त्यांना महिला पोलिसांच्या उपस्थितीत बालकल्याण समिती, बीड तसेच प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुलीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तिचा जबाब नोंदवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून समाजात संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक भूमिका घेत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत असून दोषींवर कठोर शिक्षा होण्याची मागणीही जोर धरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!