राज्यात पीएनजी विस्ताराला वेग; एलपीजीबाबत सरकारचा मोठा निर्णय….

मुंबई : राज्य सरकारने पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) नेटवर्कचा विस्तार वेगाने करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ज्या भागांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांनी ३० जूनपर्यंत एलपीजी सिलिंडरऐवजी पीएनजीचा वापर सुरू करावा, अशी अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

पीएनजी सेवा घेण्यासाठी संबंधित गॅस पुरवठा कंपन्यांकडे (सीजीडी) जूनपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली.
या निर्णयामुळे एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून सुरक्षित, स्वस्त आणि सातत्यपूर्ण गॅसपुरवठा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक चंद्रकांत डांगे, कृषी विभागाचे संचालक सुनील बोरकर तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक व राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी उपस्थित होते.
पीएनजी पुरवठा संस्थांना (सीजीडी) कामे वेगाने पूर्ण करता यावीत यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मागितलेल्या सर्व परवानग्या केवळ २४ तासांत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, रस्ते खोदकामासाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात येणार असून, खोदकामानंतर संबंधित संस्थांनी रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. याशिवाय, ही कामे २४ तास सुरू ठेवण्यास तसेच पावसाळ्यातही सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती चंद्रकांत डांगे यांनी दिली.’
राज्यातील एलपीजी पुरवठ्याबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सध्या राज्यात २३ एलपीजी प्रकल्प कार्यरत असून, त्यामार्फत अंदाजे ३.५ कोटी ग्राहकांना सेवा दिली जात आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून, सिलिंडरच्या उपलब्धतेत कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वी सरासरी दररोज सुमारे ५.९ लाख सिलिंडर्सचा पुरवठा केला जात होता, तर सध्या तो सुमारे ५.८ लाख सिलिंडर्सच्या पातळीवर स्थिर ठेवण्यात आला आहे. ऑइल इंडस्ट्रीचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचाही पुरवठा पुरेसा असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.