लोणी काळभोर ‘यात्रेचा’ कुस्ती आखाडा प्रेक्षणीयच ! 30 लाखांच्या बक्षीसांची लयलूट व राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पैलवानांच्या कुस्त्या रंगल्या…!


उरुळी कांचन: एखाद्या गावाच्या आखाड्यात पहिल्यांदाच झालेली महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख व महाराष्ट्र केसरी पै पृथ्वीराज मोहोळ यांची शेवटची रोमहर्षक कुस्ती त्या बरोबर अनेक महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार विजेते, उपमहाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशा पैलवानांची मांदियाळी, संयोजकांनी केलेले आखाड्याचे सुरेख नियोजन, सुमारे ३० लाख रुपयांची रोख बक्षिसे, सर्व प्रेक्षकांना व्यवस्थित कुस्त्या पहाता याव्या म्हणून नवीन आखाड्यात केलेली सुरेख बैठक व्यवस्था व आखाड्यात केलेली ३ डिजिटल स्क्रीनची सोय आणि हजारो कुस्तीप्रेमी प्रेक्षकांची उपस्थिती त्यामुळे रात्री साडे दहा पर्यंत चाललेला निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा हे यावर्षीच्या लोणी काळभोर येथील श्रीमंत अंबरनाथ यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा गुुरुवार (२) व शुक्रवार (३ एप्रिल) रोजी साजरी झाली. शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या या आखाड्यात महाराष्ट्र राज्यातील नामवंत मल्ल उपस्थित होते. समालोचक म्हणुन प्रशांत भागवत यांनी काम पाहिले. दुपारी गावकरी वाजत गाजत मिरवणुकीने आखाड्यात आल्यानंतर कुस्ती आखाड्याला सुरुवात झाली. सुरुवातीला छोट्या छोट्या कुस्त्या लावण्यात आल्या. त्या नंतर निकाली ६१ कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली.

सर्वात मोठी व शेवटची २ लाख २१ हजार रुपये इनामाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख व महाराष्ट्र केसरी पै पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. दुसरी २ लाख रुपयांची कुस्ती दीपक हुडा व हिंदकेसरी विक्रांत कुमार यांच्यात झाली. या कुस्तीत विक्रांत कुमारने पोकळ घिस्सा डावावर दीपक हुडाला पराभूत केले. दिड लाख रुपयांच्या तिसऱ्या क्रमांकावरील कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने हरियाणाचा जसपाल सिंगला लपेट डावावर अस्मान दाखवले. दिड लाख रुपयांच्या चौथ्या क्रमांकावरील कुस्तीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा पै जयदीप पाटीलने सैन्यदलाच्या अमित कुमारला पराभूत केले.

कुस्त्यांच्या या जंगी आखाड्यात निकाली कुस्त्यांसाठी उपस्थित प्रेक्षकांचे व गावचे मिळून एकूण सुमारे रोख ३० लाख रुपये विजेत्या मल्लांना बक्षिस म्हणून देण्यात आले. दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन आखाड्यात प्रेक्षकांना कुस्ती व्यवस्थित दिसावी म्हणून ३ डिजिटल स्क्रीनची सोय करण्यात आली होती. गावक-यां तर्फे आलेल्या प्रेक्षकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे निवांत बसून प्रेक्षकांनी कुस्त्यांचा आनंद घेतला. तसेच यूट्युबवरही तीन चॅनलच्या माध्यमातून या आखाडय़ाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी घरी बसूनही ऑनलाईन कुस्ती पाहण्याचा आनंद लुटला.

परिसरातील गावांमध्ये पाऊस झाला परंतु लोणी काळभोर मध्ये आखाड्याच्या वेळी पाऊस आला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना उत्साहात चांगल्या कुस्त्या पाहण्याचा आनंद मिळाला. २००१ सालचे महाराष्ट्र केसरी पै राहुल काळभोर व त्यांचे सहकारी, काळभैरवनाथ अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, स्थानिक गावकरी यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे प्रेक्षकांना चांगल्या कुस्त्या बघण्याचा आनंद मिळाला. ४ वाजता सुरु झालेला आखाडा रात्री साडे दहा वाजता संपला.

यावेळी संयोजकांनी केलेले चोख, सुंदर नियोजन, त्याला गावकर्‍यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे आजचा आखाडा अतिशय सुरेख व देखणा झाला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मल्लांनी व कुस्ती शौकीनांनीही आखाड्याच्या चांगल्या नियोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!