‘मामा’चा मुखवटा फाटला; अशोक खरातच्या अटकेनंतर आता पुण्यातील भोंदू बाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश, शिवदत्त आश्रम रडारवर..


पुणे : राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणामुळे भोंदू बाबांच्या कारवायांची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता खेड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

चांडोली येथील शिवदत्त आश्रमात येथे अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप एका भोंदू बाबावर करण्यात आला आहे. नवनाथ पंढरीनाथ गवळी असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकारांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुण्यातील चांडो परिसरात नवनाथ गवळी हा स्वतःला ‘महाराज’ म्हणवत शिवदत्त आश्रम चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पातळीवर त्याला ‘मामा’ या नावानेही ओळखले जाते.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आश्रमात दोष निवारणाच्या बहाण्याने महिलांना बोलावले जात होते. ती आश्रमात गेल्यानंतर आरोपी गवळीने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे.

तसेच, अध्यात्माच्या आडून शारीरिक संबंधांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचाही गंभीर आरोप पीडितेने केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सुरुवातीला आरोपीच्या भीतीपोटी पीडित महिलेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्रास असह्य झाल्यानंतर तिने धाडस करून संपूर्ण घटना आपल्या पतीला सांगितली. पतीने तिला पूर्ण पाठिंबा देत पोलिसांत तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले. पीडितेच्या तक्रारीनंतरराजगुरुनगर पोलीस ठाण्यात यांनी तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

माझ्यासोबत ज्या प्रकारे अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न झाला, तसा प्रकार इतर कोणत्याही महिलेसोबत होऊ नये. या भोंदू बाबावर कडक कारवाई झालीच पाहिजे. गुन्हा दाखल होऊनही तो अजून मोकाट कसा? असा संतप्त सवाल पीडित महिलेने उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!