भारतीय रेल्वेचे नवे कडक नियम लागू; तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती नुकसान होणार?

पुणे : भारतीय रेल्वेने प्रवासी सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी तिकीट आरक्षण व परतावा नियमांमध्ये मोठे आणि ऐतिहासिक बदल जाहीर केले आहेत. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत.

प्रवाशांनी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रवासाचे आरक्षण करावे, तसेच तिकीट काळाबाजाराला आळा बसावा, यासाठी प्रशासनाने तिकीट रद्द करण्याच्या वेळेत आणि परताव्याच्या कपातीच्या दरात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
या नव्या नियमांमुळे काही प्रवाशांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असली, तरी दुसरीकडे रेल्वे प्रवासातील सुविधा, सेवा गुणवत्ता आणि व्यवस्थापन अधिक सुधारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परताव्याच्या कपातीसाठी नवे आणि कडक निकष लागू करण्यात आले आहेत. या बदलांमुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नव्या नियमांनुसार, जर एखादा प्रवासी गाडी सुटण्याच्या ८ तास आधी तिकीट रद्द करत असेल, तर त्याला तिकिटाचा एकही रुपया परत मिळणार नाही.
यापूर्वी ही मर्यादा फक्त ४ तासांची होती; मात्र आता ती वाढवून ८ तास करण्यात आल्याने प्रवाशांनी आपले प्रवास नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरणार आहे. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांनुसार तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परताव्याची कपात टप्प्याटप्प्याने ठरवण्यात आली आहे.गाडी सुटण्यापूर्वी ८ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५० टक्के रक्कम कपात केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, २४ ते ७२ तास आधी आरक्षण रद्द केल्यास २५ टक्के रक्कम वजा केली जाईल.
तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना केवळ नियमानुसार किमान लिपिकीय (क्लर्केज) शुल्क भरावे लागेल आणि उर्वरित रक्कम परत मिळेल. या नव्या नियमांमुळे प्रवाशांनी वेळेआधी नियोजन करून तिकीट रद्द करण्यास प्राधान्य देणे आवश्यक ठरणार आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा देखील केल्या आहेत. नव्या सुविधेनुसार, प्रवासी आता गाडी सुटण्याच्या अवघ्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन (प्रवास सुरू करण्याचे ठिकाण) ऑनलाइन पद्धतीने बदलू शकणार आहेत. यामुळे शेवटच्या क्षणी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडण्याची अधिक लवचिकता प्रवाशांना मिळणार आहे.
तसेच, ट्रेनमध्ये वरच्या वर्गातील (उदा. स्लीपरमधून थ्री-टायर एसी किंवा टू-टायर एसी) जागा रिकाम्या असल्यास, प्रवाशांना प्रवासादरम्यानच सीट अपग्रेड करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी टीटीईकडे संपर्क साधून किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपद्वारे अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा घेता येईल. या सुधारित सुविधांमुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर, लवचिक आणि प्रवासी-केंद्रित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारतीय रेल्वेने ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा देत ‘युनिव्हर्सल कॅन्सलेशन’ सुविधा सुरू केली आहे. या नव्या सुविधेनुसार, खिडकीवरून (काउंटरवरून) घेतलेले तिकीट आता देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून रद्द करता येणार असून, त्याच ठिकाणी परतावाही मिळू शकणार आहे. यापूर्वी ही सुविधा मर्यादित होती आणि प्रवाशांना तिकीट ज्या स्थानकावरून काढले होते किंवा बोर्डिंग स्टेशनवरूनच ते रद्द करावे लागत असे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, या बदलांमुळे तिकीट दलालांवर मोठा आळा बसणार आहे. तसेच ऐनवेळी प्रवास रद्द करणाऱ्यांमुळे रिकाम्या राहणाऱ्या जागांवर गरजू प्रवाशांना तत्काळ कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.
यासोबतच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ‘नो रिफंड’ची मर्यादाही वाढवण्यात आली असून, प्रवाशांनी अधिक नियोजनबद्ध आणि जबाबदारीने तिकीट आरक्षण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.